शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समाजवादी विचारांचे २१ संघटना आता एकत्र आले. मुंबईत आज दुपारी उद्धव ठाकरे, आमदार कपिल पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांच्या विविध मान्यवरांच्या उपस्थिती एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झालं. आपल्याला सगळ्यांना एकत्र येत एक प्रकाश होऊन लोकशाही वाचवायला हवी असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तुम्ही मला कुटुंबप्रमुख मानलं, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देणार नाही असंही ते म्हणाले.
देशाच्या सध्याच्या काळात लोकशाही, बंधुत्व आणि शांतता राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार सर्व समाजवादी विचाराच्या लोकांनी केला आहे, असं यावर समाजवादी नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केलं. या वेळी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी परिवाराची ही पहिलीच संयुक्त बैठक असून अनेक वर्षांनंतर या दोन्ही विचारधारा एकत्र आल्या आहेत.
दरम्यान ज्या बाळासाहेबांना संपवण्याची भाषा ज्यांनी केली होती त्या काँग्रेसबरोबरच उद्धव ठाकरे गेले. आता ते अनेकांना सोबत घेत आहेत. मात्र येणाऱ्या २०२४ निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच देशाचे प्रधानमंत्री होतील यांनी कितीही काही केलं तरी त्यांना जनता निवडून देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ते समाजवादी बरोबरच्या एकत्र येण्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.