राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालयं उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, २०३५ पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचेही निर्देश त्यांनी दिले. राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न झाल्याने १३ जिल्हा रुग्णालये बंद झाली आहेत. तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १२ जिल्हा रुग्णालयं हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळं २५ जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालयं उभारण्याचे तसेच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरण खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करून घ्यावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. सार्वजनिक आरोग्य विभागात १९ हजार ६९५ पदे रिक्त आहेत. ती भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील हे पाहावे अशी सूचनाही त्यांनी केली.